मुंबई:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठी घोषणा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
*मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजनांची घोषणा*
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहे. त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळणार आहे.
*राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरु*
त्यानंतर आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे. यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
अधिकृत घोषणा नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
*3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार –मंत्री अब्दुल सत्तार.*
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते. “कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करू लागलं आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे