
गडचिरोली:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे २०२३-२४ वर्षाच्या निवडसूची मधून वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) मध्ये पदोन्नती देण्याचा आदेश मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. यानुसार नागपूर आणि अमरावती विभागातील ८६ वनक्षेत्रपालांना पदोन्नती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणा मधील दाखल न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन राहून सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेल्या नियमित निवडसूची मधून राज्यभरातील १४७ पैकी पात्र ठरलेल्या १४४ वनक्षेत्रपालांना सहायक वनसंरक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील ५८ वनक्षेत्रपालांचा समावेश आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेल्या तदर्थ निवडसूची मधून राज्यभरातील ३२ पैकी पात्र ठरलेल्या ३१ वनक्षेत्रपालांना तात्पुरत्या स्वरूपात सहायक वनसंरक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.यात नागपूर व अमरावती विभागाच्या २८ वनक्षेत्रपालांचा समावेश आहे. ही पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याने निवड सूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा हक्क मागता येणार नसल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे.संबंधित विभागातील नियंत्रकाने कार्यमुक्त केल्यानंतर विहित मुदतीत पदस्थापनेच्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांना पदोन्नतीमध्ये स्वारस्य नाही, असे गृहीत धरून त्यांची पदोन्नती रद्द करण्यात येईल.नियंत्रक अधिकाऱ्यांनी पदोन्नत कर्मचाऱ्याला कोणत्या तारखेस कार्यमुक्त केले व ते कोणत्या तारखेस पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले.याबाबतची माहिती शासनाला द्यावी.असे आदेशही यात नमूद आहेत.