“दारू सोडा – संसार जोडा” संदेश देत विहिरगाव येथे व्यसनमुक्ती सत्संग; ४२ जणांनी घेतला कायम व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प
गोंडपिपरी :
तालुक्यातील विहिरगाव येथे राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज यांच्या नवनिर्मित मंदिर परिसरात शुक्रवार, १० एप्रिल रोजी व्यसनमुक्ती विषयक सत्संग कार्यक्रम उत्साहात पार पडला. “दारू सोडा – संसार जोडा” हा समाजजागृतीचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध गावांतील ४२ युवकांनी कायमस्वरूपी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करत नवे जीवन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सत्संग कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणपती चौधरी गुरुजी उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रसंत प. पू. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्ती आंदोलनाची महती उपस्थितांना सांगितली. व्यसनामुळे कुटुंब, समाज आणि तरुण पिढीचे होणारे नुकसान अधोरेखित करत सर्वांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच नव्या वर्षानिमित्त उपस्थित गुरुबंधूंना शुभेच्छा देत जीवनमूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला माजी सभापती सुरेशराव चौधरी (कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरी) तसेच प्रविण नेवारे (मोहाहेठी) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर विदर्भ प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव मुन्नाजी सिडाम व उपाध्यक्ष बालूभाऊ पिंपळशेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. मान्यवरांनी नव्याने व्यसनमुक्तीचा संकल्प करणाऱ्या शिवभक्तांचे अभिनंदन करत त्यांच्या नवजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्संगादरम्यान विविध गावांतील ४२ गुरुबंधूंनी कायम व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
दरम्यान, चंद्रपूर येथील शेरकी साहेब यांच्या तर्फे व्यसनमुक्ती संघटनेला गुरुबंधूंना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी वॉटर कूलर भेट देण्यात आला. या वॉटर कूलरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला वसंत चापले, भारत मोहुर्ले, गौतम खोब्रागडे, मनोज बल्की, गणेश गोहणे, नोमेश चहारे, सुनील सातपुते, माणिक देशमुख, शांताराम सातरे, अनिल बोबाटे, जीवन नागापुरे, लक्ष्मण नैताम, धनंजय देवाडे, रोशन धारे, नीलकंठ चौधरी, सुरेश मेश्राम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना, आंबे धानोरा यांच्या वतीने सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
“व्यसनमुक्त होणे म्हणजे माणसाचा पुनर्जन्म आहे,” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
