निराधार लाभार्थ्यांना वेळेत पेन्शन द्या; ‘एक खिडकी’ व्यवस्था सुरू करा
मनसेचे ब्रम्हपुरी तहसीलदारांना निवेदन; थकीत हप्ते तत्काळ वितरित करण्याची मागणी
ब्रम्हपुरी : प्रतिनिधी
संजय गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजनेतील ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग, निराधार महिला व इतर पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत नियमितपणे पेन्शन वितरित करण्यात यावी, थकीत हप्ते तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावेत तसेच तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ (सिंगल विंडो) व्यवस्था सुरू करून लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ब्रम्हपुरी शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजनेतील हजारो लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत. मात्र, पेन्शन वेळेवर जमा होत नसल्यामुळे त्यांना औषधोपचार, अन्नधान्य, दैनंदिन खर्च व इतर अत्यावश्यक गरजा भागविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या या महत्त्वाच्या योजनेचा लाभ वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केवायसी (KYC), डीबीटी (DBT), आधार पडताळणी, बँक खाते अद्ययावत करणे व इतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावर उपाय म्हणून तहसील कार्यालयात ‘एक खिडकी’ व्यवस्था सुरू करून सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच दर महिन्याला गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करून केवायसी, डीबीटी, आधार पडताळणी व इतर आवश्यक कामे गावपातळीवरच पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय प्रलंबित अर्जांची वेळेत पडताळणी करून त्यांचा तातडीने निपटारा करावा, शासनाकडून मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध करून लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळेल यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी तसेच निराधार योजनेशी संबंधित तक्रारींच्या त्वरित निवारणासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, अशीही मागणी मनसेने केली आहे.
समाजातील सर्वाधिक गरजू घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत, वरील सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ब्रम्हपुरी शहर व तालुक्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष मनसे श्री ओमप्रकाश सोनटक्के.तालुका उपाध्यक्ष मोनू मेश्राम.शहराध्यक्ष मनसे ब्रह्मपुरी, आशिष देशमुख तालुका संघटक श्री अशोकजी दुणेदार, युवा कार्यकर्ता, गणेश शेंडे रणमोचन, अजय रामटेके वायगाव, साजन रामटेके, सविन रामटेके, प्रकाश गणवीर, नरेश खोब्रागडे, धर्मेंद्र शेंडे उपस्थित होते.
