अहेरी तालुक्यातील जि.प. शाळांचे अस्तित्व धोक्यात; पेरमिली केंद्रातील अनेक शाळेचा समावेश.
अहेरी(गडचिरोली):– महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) शाळा ग्रामीण शिक्षणाचा कणा आहेत, परंतु नवीन शैक्षणिक धोरणे, खासगी शाळांचे पेव आणि कमी पटसंख्येमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी शासन उपाययोजना करत आहे, तर दुसरीकडे दुर्गम भागातील जि.प. शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे जि.प. शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अहेरी तालुक्यात २७ उच्च प्राथमिक आणि १५१ प्राथमिक असे एकूण १७८ जि.प. शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ५,२३५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तरीही दुर्गम भागातील शाळांची पटसंख्या घसरत असल्याचे निदर्शनास येते. राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शासकीय शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मांडला होता, पण विरोधानंतर शासनाने भूमिका बदलली. तरी शाळांच्या भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेवर काम करण्याची गरज आहे. तालुक्यात अहेरी, आलापल्ली, महागाव, बोरी, देवलमरी, वेलगूर, पेरमिली, राजाराम, दामरंचा, जिमलगट्टा, देचलीपेठा, उमानूर असे १२ केंद्र आहेत. या केंद्रातील १७८ जि.प. शाळांपैकी ९२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. अहेरी २, आलापल्ली ६, महागाव ४, बोरी ८, देवलमरी ३, वेलगूर ४, पेरमिली १३, राजाराम ६, दामरंचा १५, जिमलगट्टा ११, देचलीपेठा ९, उमानूर ११ शाळा, अहेरी तालुक्यात १० पटसंख्येच्या ७ आणि १० पेक्षा कमी पटसंख्येच्या ५४ शाळा आहेत. ही आकडेवारी चालू शैक्षणिक सत्राची आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ग्रामीण व गरीब भागातील मुलांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रमुख
साधन आहेत. यात पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण, उपस्थिती भत्ता, शूज सुविधा मिळतात. काही शाळा गुणवत्ता वाढवत आहेत, पण सुविधा अभाव व शिक्षक रिक्तपदे समस्या आहेत.
अनेक शाळांत एक ते दोन विद्यार्थी.
दामरंचा केंद्रातील मीचगुडा, पेरमिली केंद्रातील हिंदभट्टी व उमानूर केंद्रातील येरागड्डा शाळेत फक्त एक विद्यार्थी आहे. प्रत्येक शाळेत एक शिक्षक कार्यरत आहे. कपेवंचा (दामरंचा), बिहाडघाट (देचलीपेठा), चौडमपल्ली (पेरमिली), सिलमपल्ली (उमानूर) येथे २ विद्यार्थी आहेत. तालुक्यात ३ पटसंख्येच्या ६ शाळा असून फुलसिंगनगर (आलापल्ली), नैनेर व आशा (दामरंचा), ताडगुडा (पेरमिली), येनकाबंडा व मुळेवाही (उमानूर) या शाळांच्या समावेश आहे.
