मामा तलाव परिसरातील श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गाव एकवटले
पेरमिली येथे भूमिपूजन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर सुशोभीकरणाला प्रारंभ
अहेरी :
तालुक्यातील पेरमिली येथील मामा तलाव परिसरात असलेल्या प्राचीन श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणाच्या कामासाठी सोमवार (दि. २० एप्रिल) रोजी सकाळी १०.३० वाजता भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. मंदिराची अवस्था जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच श्रीराम रक्षा हनुमान सेवा समिती, पेरमिली यांच्या सहकार्याने मंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
पेरमिली गावातील पूर्वजांनी स्थापन केलेले हे श्री गणेश मंदिर गावाच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निर्णयामुळे गावात आनंदाचे व धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती म्हणून ओळखले जातात. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणरायाची पूजा करण्याची भारतीय परंपरा असून, गणेश उपासनेमुळे बुद्धी, समृद्धी आणि यश प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ बांधकामाचा उपक्रम नसून धार्मिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा भाग मानला जात आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद रामाजी आत्राम (माजी सरपंच, पेरमिली), संजय सडमेक तसेच गाव गडी प्रमुख – इलाका पट्टी, पेरमिली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्यास गावचे पोलीस पाटील विठ्ठल मेश्राम, रामरेड्डी बंडमवार, सत्यनारायण येगोलपवार, शंकर कुंभारे, कवीश्वर चंदनखेडे, डॉ. उत्पल विश्वास, डॉ. लक्ष्मण विश्वास, यशवंत मडावी, बंडू सडमेक, तुळशीराम चंदनखेडे, विनोद मडावी, व्यंकटेश सिडाम, बबलू गावडे, विनोद आत्राम, गजानन मडावी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी समस्त ग्रामस्थ, पेरमिली तसेच श्रीराम रक्षा हनुमान सेवा समिती, पेरमिलीचे अध्यक्ष श्रीनिवास बंडमवार, सचिव रघुनाथ औतकर व सचिन सिद्धमशेट्टीवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी आयोजकांच्या वतीने मंदिराच्या विकासकामासाठी भविष्यातही सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
