जनार्दन नल्लावार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
लॉयड्स मेटल्सचे भव्य रक्तदान शिबिर; ७७७ युनिट रक्तसंकलन, एमडी बी. प्रभाकरन यांनी केले प्रथम रक्तदान
कोंनसरी व सुरजागड येथे आयोजन; कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अहेरी : सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर शाखा लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे कोंसारी व सुरजागड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकूण ७७७ युनिट रक्ताचे संकलन झाले असून, गेल्या वर्षीच्या ५०१ दात्यांच्या विक्रमालाही मागे टाकत नव्या उच्चांकाची नोंद झाली आहे.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः रक्तदान करून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना प्रभाकरन म्हणाले की, “रक्तदान ही मानवतेची सर्वात मोठी सेवा आहे. एका छोट्याशा कृतीमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील नातेसंबंध अधिक दृढ होतात.”
या रक्तदान शिबिरात कंपनीच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. समाजाच्या आरोग्यविषयक गरजांची जाणीव ठेवून कंपनीचे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
लॉयड्स मेटल्स ही संस्था औद्योगिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण व सामुदायिक विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. भविष्यातही अशा मानवतावादी उपक्रमांद्वारे समाजाच्या आरोग्यसेवेला हातभार लावण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
