गट्टा गावात मा.सुहास गाडे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रेरणादायी दौरा; विद्यार्थ्यांशी हितगुज करत दिली शाबासकी
गट्टा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास गाडे साहेब यांनी आज गट्टा परिसराचा दौरा करत शिक्षण व ग्रामविकास कामांचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गट्टा येथील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व त्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
दौऱ्याच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून उत्साहपूर्ण व पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग, तालबद्ध सादरीकरण आणि उत्साह पाहून उपस्थित सर्व मान्यवर प्रभावित झाले. यानंतर गाडे साहेबांनी गट्टा ग्रामपंचायत, नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गट्टा शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता, नियमित उपस्थिती, वाचनाची सवय, तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी गप्पा-गोष्टी करत त्यांनी त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारपूस केली आणि मोठे उद्दिष्ट ठेऊन त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांची कला, क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता पाहून त्यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सैनु गोटा (संचालक, आदिवासी विविध सहकारी महामंडळ नाशिक), श्री आदिनाथ आंधळे साहेब गट विकास अधिकारी , श्री मडावी साहेब (प्रशासन अधिकारी), विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी श्री मनोज मेश्राम, पशुधन विकास अधिकारी श्री माणिक बांबोडे, मुख्याध्यापक श्री एम. सी. बेडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोविंद शहा, गट्टा गावाचे पाटील कन्नजी गोटा माजी उपसरपंच महारु लेखामी, मिथुन मलिक, विकास देवनाथ, तपन सरकार, संतोष आत्राम तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून शिक्षक व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक भर पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
