“आपत्तीवेळी धावणारा माणूसच खरा देवदूत” — फुले महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा प्रेरणादायी शुभारंभ
आष्टी (प्रतिनिधी): वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत आयोजित व्यक्तिमत्व विकास व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. प्राचार्य किशोर पाचभाई, श्री परशुरामकर सर व श्री किशोर उरकुंडवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व पटवून दिले.
प्राचार्य किशोर पाचभाई यांनी सांगितले की, “सशक्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्तीच समाजातील आपत्तीच्या वेळी निस्वार्थपणे मदतीसाठी पुढे येते.” त्यांनी आग, पूर, भूकंप यांसारख्या आपत्तींच्या वेळी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्तीच्या प्रसंगी मदतीला धावून जाणारा व्यक्ती हा खऱ्या अर्थाने देवदूत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी धैर्य, सेवाभाव व जबाबदारीची जाणीव ठेवून स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटकीय भाषणात डॉ. अनिता लोखंडे यांनी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक गुणांवर प्रकाश टाकत महात्मा गांधी यांच्या जीवनातील उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी प्रभावी व्यक्तिमत्वासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारत पांडे यांनी केले, संचालन डॉ. गणेश खुणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवी गजभिये यांनी मानले.
या प्रसंगी डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. श्याम कोरडे, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. नासिका गभणे, प्रा. विजया बल्की, राज लखमापूरे, निलेश नाकाडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
