पेरमिली येथील गॅस सिलेंडरच्या समस्याच्या तक्रारीची अहेरी तहसीलदारानी घेतली दखल; तहसीलदारानी दिले चौकशीचे आदेश.
अहेरी(गडचिरोली):-आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्याच्या ग्रामीण भागातील स्वयंपाक घरापर्यंत पोहोचलेला दिसून येत आहे. ग्रामीण भागातही सिलेंडरची अनेक समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अहेरी तालुक्यातील पेरमीली गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अहेरी तालुक्यातील पेरमिली हे गाव २५ ते ३० गावाकरिता मध्यस्थांचे गाव आहे. पेरमिली गावात बँक, पोलीस स्टेशन, शाळा, डाक विभाग, ग्रामपंचायत असे अनेक कार्यालय असून शासकीय व इतर कोणत्याही कामाकरिता नागरिकांना येथे नेहमी वर्दळ असते.
या परिसरातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर वाढला असून सिलेंडर विना स्वयंपाक होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागात जंगलाचे प्रमाण जास्त असले तरी वनविभागाच्या अडकाडीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सरपन(काड्या) आणणे कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पेरमिली येथे भारत गॅस व एचपी गॅस एजन्सी पुरवठाधारक असून काही तांत्रिक अडचणीमुळे गॅस सिलेंडर मिळत नसल्याचे अनेक तक्रारी अहेरी तहसील कार्यालयात प्राप्त झाले आहेत.
तक्रारीत ओटीपी न येणे, सबसिडी बाबत समस्याचे निराकरण न होणे, बुकिंग करून सुद्धा चार-पाच दिवस सिलेंडर न मिळणे असे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने सदर तक्रारीचे निवारण करण्याकरिता अहेरी तहसील कार्यालया कडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पेरमिली येथे 14 मार्चला महसूल विभागाकडून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानात महिलांनी गॅस सिलेंडर पुरवठा बाबत तक्रार केली होती. यावेळी तहसीलदारानी महिलांना तक्रारीची योग्य चौकशी करण्याची ग्वाही दिली होती.
