“गडचिरोलीत अपघात रोखण्यासाठी स्वतंत्र मालवाहतूक रस्ते उभारावेत”
मुख्यमंत्री Devendra Fadnavis व केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना निवेदन; औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या जड वाहनांमुळे नागरिकांची चिंता वाढली
गडचिरोली, दि. ११ :
जिल्ह्यात वेगाने वाढत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे जड मालवाहतूक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यातून अपघातांची मालिका चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यमान रस्ते कायम ठेवून त्यालगतच कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते उभारावेत, अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.
या संदर्भात संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती आणि औद्योगिक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असून मोठ्या ट्रक व मालवाहू वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी असलेल्या जुन्या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर उपाय म्हणून जुने रस्ते सामान्य वाहतुकीसाठी कायम ठेवून त्यालगत किमान दीड फूट उंचीचे स्वतंत्र रस्ते फक्त कारखानदारीतील माल व खनिज वाहतुकीसाठी तयार करावेत, अशी मागणी संस्थेने केली आहे. यामुळे जड वाहनांची वाहतूक स्वतंत्र मार्गाने होईल आणि नागरिकांच्या प्रवासासाठी असलेले रस्ते सुरक्षित राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ज्या ठिकाणी गावांची वस्ती आहे त्या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि दुचाकीस्वार यांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढेल, असा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष सुरपाम यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकास होत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. स्वतंत्र मालवाहतूक रस्ते तयार झाल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि सामान्य वाहतूकही सुरळीत राहील.”
दरम्यान, हे निवेदन राज्याचे सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय खान मंत्री, राज्यपाल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनाही पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनावर संबंधित विभागाकडे अर्ज पाठविण्यात आल्याचे उत्तर प्राप्त झाल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रमुख मागण्या :
कारखानदारी व खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र मालवाहतूक रस्ते
विद्यमान रस्ते सामान्य नागरिकांसाठी कायम ठेवणे
गावांच्या ठिकाणी फ्लायओव्हर उभारणे
जड वाहनांची वाहतूक स्वतंत्र मार्गाने वळविणे
