प्रतिनिधी: जितेंद्र सहारे कोरची
धान उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तातडीने जमा करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
मनोज अग्रवाल यांचा इशारा — कोरचीतील शेतकरी आर्थिक संकटात
कोरची : कोरची तालुका आदिवासीबहुल व मागासलेला असून येथील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पादन धान आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली; मात्र अद्यापही त्यांच्या खात्यात चुकारे जमा झाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे थकीत चुकारे त्वरित जमा करावेत, अन्यथा तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी दिला.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना रामसुराम काटेंगे (माजी जि.प. सदस्य), दिपक हलामी (युवक काँग्रेस अध्यक्ष), धर्मराव नैताम (नगरसेवक), लहानू सहारे, विठ्ठल शेंडे, बुधराम फुलकवर, ईश्वर लाडे, बाबुलाल शेंडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे चुकारे लवकरात लवकर जमा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
