मजुराला मारहाण केल्याप्रकरणी आमदारावर गुन्हा दाखल.
गडचिरोली:- वडसा-गडचिरोली लोहमार्गाच्या कामासाठी अवैध मुरुम उत्खनन करीत असल्याचे सांगून कामावरील मजुराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्यासह त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सह धनपाल मिसार, सागर वाढई, अमोल मिसार, ज्ञानदेव पिलारे व विजय बुरले अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे काम सुरु असून त्यासाठी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे मुरुम उत्खनन करुन भराव करण्यात येत आहे.
मंगळवारी(ता.१७) मध्यरात्री आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, धनपाल मिसार, सागर वाढई, अमोल मिसार, ज्ञानदेव पिलारे, विजय बुरले हे काम सुरु असलेल्या ठिकाणी गेले. येथे मुरुम उत्खनन कुणाच्या परवानगीने सुरु आहे, असे विचारत त्यांनी उपस्थित मजुरांशी हुज्जत घातली. यावेळी तेथे कुणाल राजगडे या मजुराने तहसील कार्यालयाच्या परवानगीने मुरुम उत्खनन सुरु असल्याचे सांगत आपण कंत्राटदाराकडे चौकशी करा, असे सांगितले. मात्र, यामुळे आमदारांच्या सहकाऱ्यांनी कुणाल राजगडे यास काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्यासह धनपाल मिसार, सागर वाढई, अमोल मिसार, ज्ञानदेव पिलारे, विजय बुरले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२),११८(१), १८९(१), १९०, १९१(२) व (३) अन्वये गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.
