*धान खरेदीसाठी सातबारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढवा-राकाँ.चे डॉ.हेमंत भाकरे यांची मागणी*
लखमापूर बोरी :-
जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर सातबारा ऑनलाईन करण्यासाठी मुदत संपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वनहक्कधारक तसेच वर्ग–१ व वर्ग–२ मधील मृत शेतकऱ्यांचे फेरफार वेळेत न झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे सातबारे अद्याप ऑनलाईन झालेले नाहीत.
मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह शेतकरी खरेदी केंद्रावर गेले असता, सातबारा ऑनलाईन करण्यास कर्मचाऱ्यांकडून नकार देण्यात आला. तसेच यासाठी तालुकास्तरीय तहसीलदारांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चामोर्शीचे तहसीलदार व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना डॉ.हेमंत पी.भाकरे जिल्हासंघठन सचिव रा.कॉं.पा.यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर खरेदी केंद्रास परवानगी मिळाली असली, तरी तोपर्यंत ऑनलाईन प्रक्रियेची मुदत संपली.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सातबारा ऑनलाईन करण्यास विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हा संघटन सचिव *डॉ.हेमंत भाकरे* यांनी पुन्हा एकदा निवेदनाद्वारे केलेली आहे. तसेच याबाबत जिल्ह्यातील सर्व शासकीय धान खरेदी केंद्रांना लेखी आदेश देण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
