आदिवासी साहित्य हे केवळ सामाजिक संघर्षाचे नव्हे तर पर्यावरणीय जाणिवेचे – डॉ. विजय रैवतकर
आष्टी:
मराठी आदिवासी साहित्य समीक्षा आदिवासींच्या जीवनातील संघर्ष, शोषण, संस्कृती आणि अस्मिता यावर आधारित साहित्याचे विश्लेषण करते. आदिवासी मराठी साहित्य समीक्षा हे आदिवासींच्या जगण्याचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचा वेध घेत असले तरी मराठी आदिवासी साहित्य हे केवळ सामाजिक संघर्षाचे साहित्य नव्हे तर पर्यावरणीय जाणिवेचे साहित्य आहे. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात मराठी आदिवासी साहित्य हे निसर्गाशी पुन्हा संवाद साधण्याची दिशा प्रदान करते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी केले. ते मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनातील गडचिरोली जिल्ह्याचे आदिवासी साहित्य या विषयावरील परिसंवादात बोलत होते. डॉ. विजय रेवतकर यांनी आदिवासी मराठी साहित्य समीक्षा यावर विवेचन करून मराठी आदिवासी साहित्याचे स्वरूप आणि समीक्षा आणि आव्हाने याची अभ्यासपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी विचारपीठावर आदिवासी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. विनायक तुमराम, परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. चिन्नमा चालूरकर, डॉ. हेमराज निखाडे, प्रा. प्रदीप चापले, प्रा. मोक्षदा मनोहर, निमंत्रक प्राचार्य डॉ संजय फुलझेले,संमेलन समन्वयक डॉ. राजकुमार मुसणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. चिन्नमा चालूरकर यांनी आदिवासी लोकसंस्कृती यावर भाष्य करून आदिवासींच्या विविध लोक परंपरा याचा परिचय उपस्थिताना करून दिला. डॉ. हेमराज निखाडे यांनी गडचिरोली जिल्हयातील आदिवासी कथा साहित्याचा आढावा घेतला आणि कथा साहित्याचा प्रवाह विकसित होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. प्रा. प्रदीप चापले यांनी गडलिरोली जिल्ह्यातील आदिवासी बोलीभाषा याचा धांडोळा घेऊन गोंडी, माडिया यासारख्या विविध आदिवासी बोली भाषेचे वैशिष्ट्ये आपल्या भाषणातून सादर केले.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कादंबऱ्यांचा आढावा प्रा.मोक्षदा मनोहर/नाईक यांनी घेतला आदिवासी कादंबरी लिहिणारे लेखक हे प्रामुख्याने आदिवासी नाही.आणि या कादंबऱ्या जेमतेम पाच ते सहा आहेत.परंतु या सर्व कादंबऱ्यांमध्ये आदिवासी जीवनदर्शन,आदिवासी संस्कृती,आदिवासी परंपरा,त्यांचे प्रश्न याचे सखोल चिंतन आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी साहित्यिकांनी कादंबऱ्या हा वागमय प्रकार न हाताळण्याची कारण मीमांसा त्यांनी आपल्या विवेचनात केली..
डॉ. राजकुमार मुसने यांनी आदिवासी चरित्र साहित्याचा आढावा घेतला.
परिसंवादाचे संचालन डॉ. श्रीराम महाकाळकर यांनी केले. तर आभार प्रा. रवी गजभिये यांनी मानले. परिसंवादात बहुसंख्येने प्राध्यापक, साहित्य प्रेमी,आदिवासी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
