
व्यसनमुक्त जीवन हेच खरे सुंदर जीवन – प्रभारी अधिकारी दीपक सोनुने.
व्यसनमुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांचा सहभाग : पेरमिली आश्रमशाळेत जनजागृती व निबंध स्पर्धा.
पेरमिली(गडचिरोली):- उप पोलिस स्टेशन पेरमिली च्या वतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रमांतर्गत मार्गदर्शन व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रभारी अधिकारी दीपक सोनुने यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे जीवनावर होणारे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगितले. “व्यसनमुक्त जीवन हेच खरे सुंदर जीवन आहे” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
शाळेचे अधीक्षक संजय भोये व आशिष गेडाम यांनी देखील मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना सकारात्मक व आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवन – सुंदर जीवन या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संदीप राजू आलामी ,द्वितीय क्रमांक जितेंद्र मुल्ला तलांडी, तृतीय क्रमांक राधा मुल्ला मडावी यांनी पटकाविले. यांना प्रोत्साहन पर वेगवेगळे बक्षीस देण्यात आले.यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी पेरमिली उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने, अंमलदार वरखडे, अधीक्षक संजय भोये, शिक्षक आशिष गेडाम, अनिल दाजगाये, आदे तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदे तर आभार प्रदर्शन अंमलदार वरखडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अशा जनजागृती कार्यक्रमांचे नियमित आयोजन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.