बीजापूर:- छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर नक्षलवाद्यांनी ब्लास्ट केला आहे. या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी ६ जानेवारी रोजी कुटरू भागात ही घटना घडली. नक्षल ऑपरेशन विवेकानंद सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता हा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी ज्या सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला, त्या वाहनात ९ पेक्षा अधिक जवान होते. सुरक्षा दलानीही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.
बस्तरच्या महानिरीक्षकांनी जवानांचं वाहन उडवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ जवान शहीद झाले आहेत. अलीकडच्या काळात आपल्या जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर इतर ठिकाणांहून जवानांच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचत आहेत.
बीजापूरमध्ये झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. सोमवारी कुटरू भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी वाहनावर IED ब्लास्ट करत स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.