निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
अकोला:- गट ग्रामपंचायत कौलखेड गोमासे येथील एका महिला सरपंचाच्या पतीने घरकूल आवास योजनेसाठी लाभार्थी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तर 5 हजारांची लाच स्वीकारत असताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधिताला रंगेहात पकडले.
अनिल गोमासे असे या लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदार यांनी शुक्रवारी (दि.1) अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दिली. त्यांच्या वडिलांच्या नावे रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर होऊन मिळण्याकरिता व तक्रारदार यांच्या वडिलांचे नाव ग्रामपंचायत ठरावामध्ये समाविष्ट करून सदर योजनेचा लाभ देण्यासाठी, गट ग्रामपंचायत (कौलखेड गोमासे) च्या सरपंचाचे पती अनिल गोमासे यांनी त्यांच्या पत्नीच्या सरपंचपदाचा प्रभाव पाडून 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.1) पडताळणी कार्यवाही करण्यात आली. पडताळणी कार्यवाही दरम्यान अनिल गोमासे यांची पंचायत समिती कार्यालय अकोला येथे तक्रारदारसोबत भेट होऊन कामासंबंधाने बोलणी झाली असता, गोमासे यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून 10 हजार रुपये तत्काळ देण्यास सांगितले. परंतु, तक्रारदार यांनी असमर्थता दर्शविल्याने 5 हजार रुपये दुसऱ्या दिवशी व राहिलेले 5 हजार रुपये काम झाल्यानंतर स्वीकारण्याचे अनिल गोमासे यांनी मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर रविवारी (दि. 11) अनिल गोमासे यांनी मध्यवर्ती बसस्थानक अकोला येथे तक्रारदाराकडून पाच हजार लाच रक्कम स्वीकारल्याने, त्यांना सापळा रचून तत्काळ पंचासमक्ष रंगेहात पकडून ताब्यात घेतले.