जया लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
अकोला:- खाकी वर्दीचा रुबाब भारी,माझी ड्युटीच मजला प्यारी…! हे महाराष्ट्र पोलिसांचे गौरव गीत सोशल मीडियाच्या सर्व महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाले असून या गाण्याला महाराष्ट्र भरातून पसंती मिळत आहे.
अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या सज्जनांच्या रक्षणासाठी कायम सज्ज असणाऱ्या या महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानासाठी सहा. पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी पोलिसांवर एक गौरव गीत तयार केले आहे.
पंकज कांबळे हे अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची अनेक गीते गाजली आहेत. पोलिसांच्या गौरवशाली इतिहासाची, संस्कृतीची आणि कर्तृत्वाची जडणघडण या गाण्यात दिसून येते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. त्याच वाक्याला जागत पोलिस रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी सदैव म्हणजे २४ तास तत्पर असतात. खाकीच्या त्याग आणि त्यांच्या कर्तुत्ववाचे मिश्रण कांबळे यांनी शब्दबद्ध केले आहे.संघपाल तायडे यांनी गायलेले व राहूल तायडे यांच्या स्वरसाजातून निर्माण झालेले हे गाणे पोलिसांचे शौर्य, वीरता आणि कटिबद्धता याचे उदाहरण आहे. या गाण्यातील व्हिडिओच्या चित्रिकरणात अकोला पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील विविध पदावरील आणि खात्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले आहे. त्यात अकोला शहरातील नागरिकांना भयानक परिस्थितीतही पोलीस कसे मदत करतात हे दाखवण्यात आले आहे.
‘राहतो चोवीस तास दक्ष करतो तपास निष्पक्ष, घरदार विसरून फक्त गुन्हयावरती लक्ष’..!!
गाण्यातल्या पहील्या ओळीतील प्रत्येक शब्दावरून पोलिसांची किर्ती ऐकायला मिळते. गाण्याची चाल, मांडणी आणि बारकावे कांबळे यांनी जपले आहेत.धकाधकीच्या जीवनात पोलिसांचे जीवन अधिकच विस्कळीत होऊन जाते. पोलिस सातत्याने खाकी वर्दीतच राहतात, त्यामुळे उत्सवांचा अनुभव खाकीतच घ्यावा लागतो. सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांना वेगवेगळ्या अडचणींना आणि समस्यांना सामोरे जावं लागतं. त्या समस्या व व्यथा त्यांनी सुबकपणे मांडल्या आहेत.
‘सण उत्सव आला की आमचा जीव असतो गहान, नाही उत्सव ना सण नाही भूक ना तहान’
मात्र हे लिहीत असताना पंकज कांबळे यांनी खाकी वर्दी एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असते. वर्दी परिधान केली की, कितीही थकलेले असले तरी एक प्रचंड ऊर्जा अंगात भिनते. मग कुठेही कोणतेही काम असो काही विशेष वाटत नाही. असेही ते म्हणतात.