कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील केर्ले गावात घडलेल्या या घटनेत सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी आता दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वरूप माने (वय ११) असे त्या मुलाचे नाव आहे.अशी घडली घटना कुमार हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा सहावीत शिकत आहे. तो लघूशंकेसाठी जात होता. त्यावेळी शिक्षकांनी त्याला दुरावस्थेत असलेले शाळेचे गेट बाजूला करण्याचे सांगितले. त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये रुग्णालयात नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणात पालक संतप्त झाले. त्यानंतर शाळा प्रशासनाने हालचाली केल्या. या प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. करवीर पोलीस स्टेशनमध्ये वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज मुळे आले सत्य.
शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते. त्याची दुरावस्था झाली होती. त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेली नाही. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये शिक्षक सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचे दिसत होते. त्यावेळी ते गेट स्वरुप माने याच्या अंगावर पडले. यामुळे त्या विद्यार्थ्यास गेट बाजूला करण्याचे सांगणाऱ्या वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोघं शिक्षकांवर गुन्हा दाखल केला.
स्वरूप माने याच्या मृत्यूमुळे पालक संतप्त झाले. त्यांनी एकच आक्रोश केला. गावातील असंख्य ग्रामस्थ शाळेत पोहचले. त्यावेळी प्रशासनाला त्यांनी जाब विचारत गोंधळ घातला होता. तसेच घोषणाबाजी केली. यामुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.