विमानतळासाठी सुपीक जमिनी अधिग्रहणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
खासदार डॉ. नामदेव किरसान यांची भूमिका स्पष्ट; “शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही”
गडचिरोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित विमानतळासाठी हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर परिसरातील सुपीक शेतीजमिनींचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या हालचालींविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यासंदर्भात गडचिरोली येथील शासकीय विश्राम भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले. विकासकामे आवश्यक असली तरी ती शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी नसावीत, असे ते म्हणाले. स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगत त्यांनी शासनाने संवादातून मार्ग काढण्याची गरज अधोरेखित केली.
“हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर परिसरातील जमिनी अत्यंत सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही,” असेही डॉ. किरसान यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रस्तावित विमानतळासाठी सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करू नयेत, त्याऐवजी पर्यायी जागेचा विचार करावा तसेच स्थानिक शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेमुळे विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत जिल्ह्यात नवी चर्चा सुरू झाली असून, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
