राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली तालुक्यात विनोबा आश्रम शाळेचा घवघवीत यशाचा पताका
दहावीच्या निकालात तालुक्यात द्वितीय क्रमांक; ९६.७७ टक्के निकालाने शाळेची मान उंचावली
एटापल्ली : जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर विनोबा आश्रम शाळा, हेडरी येथील विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत एटापल्ली तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेसाठी शाळेतील एकूण ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९६.७७ टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळेचा लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे नॅशनल सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट, नागपूरचे कार्यकारी संचालक मा. श्री. शेखरजी टोंगो साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका सौ. के. ए. आईचंवार, वर्गशिक्षक श्री. डफ सर, कु. कावळे मॅडम, श्री. येनुगवार सर तसेच अधीक्षक श्री. मारकवार सर यांनी विद्यार्थ्यांकडून कठोर परिश्रम करून घेत प्रभावी अध्यापन केले. नियमित लेखन सराव, अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
यासोबतच शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री. तोटावार सर, इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे सर्व शिक्षक-शिक्षिका, अधीक्षक, अधिक्षिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शाळेला हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापिका, प्राथमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून भविष्यातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
