एटापल्ली तालुक्यात गाजला गट्टा शाळेचा ‘स्पेलिंग स्टार’!
बादल नवडी अव्वल; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दमदार झेप
एटापल्ली : तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गट्टा येथील विद्यार्थी बादल नवडी याने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि भाषिक कौशल्याचा ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली असताना, बादलने कठीण व आव्हानात्मक इंग्रजी शब्दांचे अचूक स्पेलिंग देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या उल्लेखनीय यशामुळे बादल नवडीची जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेसाठी निवड झाली असून, आता तो एटापल्ली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशामुळे गट्टा शाळेचे नाव उंचावले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बादलच्या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण परिश्रम, अभ्यासातील चिकाटी आणि इंग्रजी विषयावरील विशेष मेहनत हे प्रमुख घटक ठरले आहेत. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम.सी. बेडके यांचे कुशल नेतृत्व आणि शिक्षकवर्गाचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे ठरले. श्री. टेकाम सर, श्री. धुर्वे सर, श्री. नरोटे सर, श्री. गोटा सर आणि सीमा मॅडम यांनी विद्यार्थ्याला योग्य दिशा देत नियमित सराव, शब्दसंग्रह वाढविणे आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
शाळेच्या वतीने बादल नवडीचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साह संचारला असून शैक्षणिक प्रगतीसाठी नवी प्रेरणा मिळत आहे.
