वीज ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविले जाईल:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
नागपूर:- राज्यात महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून त्यांच्या उपस्थितीतच हे मीटर लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली.
टोरंट कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरु आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना असूनही त्यांच्याकडून वसुली सुरु आहे, आदी मुद्दे राजेश मोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) भास्कर जाधव यांनी स्मार्ट मीटर सक्तीचा मुद्दा उपस्थित केला. कोकणातील अनेक चाकरमानी बराच काळ मुंबईत असतात व त्यांची घरे बंद असतात. पण त्यांच्या घराची कुलुपे तोडून महावितरणकडून जुनी मीटर काढून स्मार्ट मीटर बसविली जात असल्याची तक्रार जाधव यांनी केली.
घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविली जाणार नाहीत, असे आश्वासन फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते, तरीही स्मार्ट मीटर सक्तीने व ग्राहकांच्या घरात घुसून त्यांच्या अनुपस्थितीत लावली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावर ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे चुकीचे असून तसे न करण्याचे आणि ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश दिले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
