
२० हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
मुंबई:- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वसतिस्थाने घोषित करण्यासाठी सर्व जिल्हे/ महानगर पालिकांककडून शाळा व वसतिस्थाने यातील अंतराबाबत माहिती मिळवली आहे. आता त्या माहितीच्या आधारे प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक इयत्तांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरी व ग्रामीण वसतिस्थानातील विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा/भत्ता देण्यात येणार आहे.
या सुविधेसाठी ग्रामीण व शहरी असे एकूण ३ हजार ३४१ वस्तीस्थाने आणि एकूण २० हजार ४२२ विद्यार्थी संख्या निश्चित केली असून, सन २०२५-२६ या वर्षासाठी सदर वसतिस्थाने घोषीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्याच्या वसतीस्थानाच्या (निवासस्थान) १ कि.मी. च्या परिसरात, इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ३ कि.मी. च्या परिसरात व इ. ९ वी व इ.१० वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ५ कि.मी. च्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी ही वस्तीस्थाने घोषित करण्यात आली आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना वितरीत करण्याची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT) जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, या शासन निणर्यामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.