📰 आष्टीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
आष्टी, दि. 27 फेब्रुवारी 2026 : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे मराठी भाषा गौरव दिन आणि ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी निवडक कवितांचे भावपूर्ण सादरीकरण केले आणि उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
विद्यार्थिनी प्राची, मोहिनी आणि दीक्षा यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यावर मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
