3.44 लाखांचा अवैध दारूसह मुद्देमाल जप्त; आष्टी पोलिसांची कारवाई
आष्टी, प्रतिनिधी : अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत आष्टी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूसह एक चारचाकी वाहन जप्त केले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे आष्टी येथे अपराध क्र. 53/2026 कलम 65(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.10 ते 3.00 वाजण्याच्या दरम्यान मौजा आष्टी येथील कोहळे पेट्रोल पंपासमोर, संजय पंदिलवार यांचे लेआऊट जवळ आष्टी–आलापल्ली मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मुखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी संशयित वाहन थांबवून दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली.
या कारवाईत सुनिलसिंग प्रतापसिंग बैस (वय 49, रा. बाजार वार्ड, कन्यका मंदिर, चंद्रपूर) याला अटक करण्यात आली.
पोलीसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात —
₹1,20,000 किमतीची 1500 नग देशी दारू (90 मि.ली.)
₹24,000 किमतीच्या 120 बिअर कॅन्स
₹2,00,000 किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार
असा एकूण ₹3,44,000 किमतीचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
फिर्यादी पोलीस शिपाई संजय मारोती राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गोकुलदास मेश्राम करीत आहेत. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
