*चन्नावार परिवाराकडून पाणपोईचा शुभारंभ*…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी….
चामोर्शी येथील बसस्थानका जवळील काळी-पिवळी पॉइंट परिसरात चन्नावार परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाणपोई सुरू करण्यात आली. स्वर्गीय दिवाकर चन्नावार व स्वर्गीय नैनाताई चन्नावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला असून, स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
पाणपोईचे उद्घाटन पर्यावरण सेलचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश भैय्या ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निकेशभाऊ गद्देवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय शातलवार, काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख विजय लाड, तसेच नितीन चन्नावार व अतुल चन्नावार ,अमर पठाण, विलास सर, प्रशांत विश्वास, यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
चामोर्शी बसस्थानक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करीत असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची गरज भासते. ही गरज लक्षात घेऊन चन्नावार परिवाराने पाणपोईची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी बसस्थानकावरील प्रवासी, रिक्षाचालक, कामगार तसेच नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चन्नावार परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे नागरिकांना दिलासा मिळतो, तसेच सामाजिक एकात्मतेला बळकटी मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
चन्नावार परिवाराकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. पाणपोईच्या माध्यमातून प्रवाशांची तहान भागविण्याचे पुण्याचे कार्य परिवाराकडून सातत्याने केले जात असून, यावर्षीही हा उपक्रम उत्साहात पार पडला. नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
