*निवृत्त सेवा पुरस्काराने एम. के. चलकलवार दाम्पत्याचा गौरव*…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने तसेच हिंगोली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार समारंभात सेवानिवृत्त एम. के. चलकलवार व त्यांच्या पत्नी सौ. नलिनी एम. चलकलवार यांना ‘निवृत्त सेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मारणे यांच्या हस्ते शाल, मानचिन्ह, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला. आपल्या दीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावल्याबद्दल चलकलवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे अध्यक्ष मारणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यांनी चलकलवार यांच्या कार्यपद्धतीचे व समाजाभिमुख दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले.
सौ. नलिनी चलकलवार यांनीही पतीच्या सेवाकाळात दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कुटुंबाच्या सहकार्यामुळेच सेवेत उत्कृष्ट कार्य करता आले, असे मनोगत चलकलवार यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी असोसिएशनचे आभार मानत, निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पदाधिकाऱ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात पार पडला.
या सत्कारामुळे परिसरातील पेन्शनर्समध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त.
