गडचिरोलीत तांदूळ व्यापाऱ्याकडून कोट्यवधींची वसुली; आमदार नाना पटोले यांचा विधानसभेत गंभीर आरोप.
मुंबई:- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
सदर व्यापाऱ्याचे नाव अग्रवाल असून त्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले आहे. त्याने शासकीय धानाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू केला आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे अरवा तांदूळ तयार करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. असे असतानाही केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून ‘उसणा’ तांदूळ तयार केला जातो, जो सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी नियमानुसार ग्राह्य धरला जात नाही. तरीही शासकीय धानाची उचल करून तो तांदूळ खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. पुरवठा विभागाने या व्यापाऱ्याला दोनदा रंगेहात पकडूनही त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही? असा सवाल पटोलेनी लक्षवेदीद्वारे केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचीही मागणी केली.
कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस, तर कधी भाजपच्या नेत्यांशी संधान साधून मंत्रालयातील कामे पदरात पाडून घेणे, हा आकाश अग्रवाल याचा जुना हातखंडा आहे. याच बळावर त्याने भाजपच्या एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एवढेच नाही तर राईस मिलर्सकडून जमा केलेल्या वसुलीतून मुख्यमंत्र्यांना धनादेशही दिला, असा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.
रेशनमार्फत निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वितरण
राज्यातील गोरगरिबांना रेशन दुकानांमार्फत दिला जाणारा तांदूळ पौष्टिक असण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. राईस मिलर्स व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे, असे नाना पटोले याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे याकडे लक्ष वेधताना म्हणाले. या प्रकरणी त्यांनी त्यांना धारेवरही धरले. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत स्थानिक धानाची भरडाई करून तोच तांदूळ वाटणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी व व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे लगतच्या आंध्रप्रदेशातून निकृष्ट तांदूळ स्वस्तात आयात केला जातो.
शासनाकडून मिळालेले दर्जेदार धान खुल्या बाजारात वळवून, त्याऐवजी आयात केलेल्या निकृष्ट तांदळाला वारंवार पॉलिश करून रेशन दुकानांमार्फत वितरित केले जात आहे. या निकृष्ट अन्नामुळे राज्यात, विशेषतः गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषणामुळे सुमारे 2 हजार बालकांचा व अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत? असा सवालही नाना पटोले यांनी या प्रकरणी उपस्थित केला
