*कोरची तालुक्यात काँग्रेसने केले मनरेगा बचाव आंदोलन*
*मौजा कोटरा येथे केला केंद्र सरकारचा निषेध*
कोरची – भाजप सरकारने मनरेगा योजना गुंडाळून ‘जी राम जी’ योजना सुरू केली तसेच या योजनेतून महात्मा गांधी यांचे नाव कमी केले.या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे.गोरगरिबांच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार देणारी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) केंद्र सरकारने बंद करून त्याजागी ‘जी राम जी’ ही नवी योजना आणून मजुरांचा रोजगार मागण्याचा घटनात्मक अधिकारच संपुष्टात आणला आहे.
1973 च्या दुष्काळात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेची मुहूर्तवेढ रोवली होती.या योजनेचे यश पाहून तत्कालीन प्रधानमंत्री डॉ मनमोहनसिंग यांनी 2005 मध्ये संपूर्ण देशात मनरेगा लागू केली. यामुळे मजुराना वर्षातून 100 दिवस काम मिळण्याचा कायदेशीर हक्क मिळाला होता.मात्र केंद्रातील भाजप सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘जी राम जी’ योजना सुरू केली आहे.यामुळे मजुरांचा काम मागण्याचा हक्क हिरावला गेला असून ग्रामसभेला काम मंजुरीचे असलेले अधिकारी काढून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मौजा कोटरा येथे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आला.याप्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे,पंचायत समितीच्या माजी सभापती सौ कचरीताई काटेंगे,माजी सरपंच तुलाराम मडावी,सरपंच श्यामलाल घावडे,उपसरपंच जीवन नुरूटी, पंजाबराव ऊइके दामेसाय कोवाची,जगदीश काटेंगे, नथुलाल ऊइके,तुळशीराम बावनथळे, रेखा शहारे,हिना कोरेटी आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
