
कोपरअली गावजवळ सापळा रचून गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 21,00,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
भास्कर फरकडे/ उपसंपादक इंद्रावती विदर्भ टाइम्स
गडचिरोली : जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी एक इसम नामे मनोज मजुमदार आपल्या चारचाकी बोलेरो पिकअपने चंद्रपुर-मुलचेरा-एटापल्ली मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर सदर पथक मुलचेरा तालुक्यातील कोपरअली गावजवळ सापळा रचून बसले असता, रात्री 12.00 वा दरम्यान एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून त्यास वाहन अडविण्याचे कारण सांगून वाहनाची तपासणी केली.
सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध विदेशी दारू व बिअरचे 143 पेटी किंमत अंदाजे 14,00,400/- रु. मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी बोलेरो पिकअप वाहन क्र. एम. एच. 33 टी 5095 किंमत अंदाजे 7,00,000/- रु. असा एकुण 21,00,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे मुलचेरा येथे कलम 65 (अ) व 98 (2) महा. दा. का. अन्वये इसम नामे मनोज मजुमदार वय 45 वर्ष रा. ता. एटापल्ली. जि. गडचिरोली याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर इसमावर यापूर्वी देखील पोस्टे गडचिरोली येथे अवैध दारुच्या बेकायदेशीर वाहतूकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी डॉ. श्रेणिक लोढा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/गरफडे, पोअं/करमे आणि चापोअं/निसार यांनी पार पाडली.