
जंगली अन्नपदार्थ खाताना दक्षता घेण्याचे आवाहन.
धानोरा(गडचिरोली):- धानोरा तालुक्यातील टवेटोला येथे जंगलातूनआणलेल्या डुंबरसात्यांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. २७ जून रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, सर्व रुग्णांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून, ते स्थिर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टवेटोला गावातील नागरिकांनी जंगलातून डुंबरसात्या गोळा केले आणि त्यांची भाजी तयार केली. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तींना उलट्या, मळमळ आणि जुलाब यांसारखे त्रास जाणवू लागले. रात्रीपर्यंत त्रास वाढल्याने दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २८ जून रोजी सकाळी आठ वाजता त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.विषबाधा झालेल्यांमध्ये विद्या देवनाथ नैताम (३ वर्षे) व अक्षर देवनाथ नैताम (१० वर्षे) यांचा समावेश आहे. हे दोघे कनारटोला येथील असून, ते टवेटोला येथील आपल्या नातेवाईकांकडे, म्हणजेच ललिता रामदास नैताम (४५ वर्षे), सपना रामदास नैताम (१६ वर्षे) आणि स्वप्नील रामदास नैताम (२६ वर्षे) यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते.
आरोग्य विभागाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे या घटनेचे गंभीर परिणाम टळले असून, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगली अन्नपदार्थ वापरताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मशरूम ओळखतांना ही काळजी घ्या.
क्लिनिकल न्यूट्रिशिअनिस्ट डॉ. नुपूर म्हणतात की, काहीवेळा लोक जेवणाची सुरुवात म्हणून मशरूम खातात आणि काही लोक मशरूमचे पदार्थ दारू पितांना खातात, जे आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात.
त्यांनी असंही सांगितलं की, “काही वेळा सामान्य मशरूम खाल्ल्याने देखील अन्न विषबाधा होऊ शकते. मशरूम 7 वर्षांपेक्षा लहान मुलांना देऊ नये कारण त्यांच्या शरीरात मशरूम पचवू शकणारे नसतात.”
डॉ. नुपूर सांगतात की, तुम्ही बाजारातून मशरूम विकत घेत असताना ते कडक असलं पाहिजेत. त्यात कोणत्याही प्रकारचा ओलावा नको. तसेच, मशरूम प्लास्टिकमध्ये ठेवू नये कारण ते मशरूमसाठी हानिकारक असू शकतं.
त्या असंही सांगतात की, जर तुम्ही ताजे मशरूम तोडून आणले असेल तर ते 48 तासांच्या आत खायला हवे.
त्या म्हणाल्या, “मशरूमचं उत्पादन नेहमी नियंत्रित वातावरणात घेतले जातं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मशरूमला जंगलात तोडून खाऊ शकत नाही कारण ते धोकादायक असू शकतात.”