आरबीआयचा बँक ऑफ महाराष्ट्रला दणका.
स्वयंसहायत्ता गटांच्या सदस्यांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन संस्थांना न दिल्यानं आणि केवायसी संदर्भातील पूर्तता न केल्याने बँक ऑफ महाराष्ट्रला 32.50 लाखांचा दंड.
मुंबई : रिझर्व्ह ऑफ इंडिया देशातील सर्व बँका, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांच्या कामकाजाचं नियंत्रण करते. बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून बँकिंग नियमन कायद्याचं पालन न झाल्यास आरबीआय कडून आर्थिक स्वरुपात दंडाची कारवाई केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 13 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकांनुसार बँक ऑफ महाराष्ट्र, डीसीबी बॅक लिमिटेड, नावी फिनसर्व्ह लिमिटेड, आयआयएफल फायनान्स लिमिटेड, सीएसबी बँक लिमिटेड यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर, इंडियन मर्चंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, लखनौचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार कारवाई.
बँक ऑफ महाराष्ट्रला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 6 फेब्रुवारीच्या आदेशानं 32.50 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रानं आरबीआयच्या नियमानुसार स्वयंसहायत्ता गटांच्या सदस्यांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन संस्थांना न दिल्यानं आणि केवायसी संदर्भातील पूर्तता न केल्यानं दंड करण्यात आला आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत दंडाची कारवाई केली आहे.
डीसीबी बँक लिमिटेडला आरबीआयनं 6 फेब्रुवारीच्या आदेशानं 29.60 लाखांचा दंड केला आहे. अकृषिक सोने तारण कर्ज खात्यांच्या संदर्भात लोन टू वॅल्यू हे सूत्र कायम न राखल्यानं ही कारवाई आरबीआयनं केली आहे.
नावी फिनसर्व्ह लिमिटेडला आरबीआयनं 3.80 लाख रुपयांचा दंड केला आहे. रिकव्हरी एजंट संदर्भातील आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीनं ग्राहकांना कर्जाच्या परतफेडीसाठी सायंकाळी 7 नंतर आणि सकाळी 8 वाजण्यापूर्वी संपर्क केला होता.या संदर्भातील प्रोटोकॉल पाळण्यात आले नाहीत, असं आरबीआयनं म्हटलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आयआयएफल फायनान्स लिमिटेडला 5.30 लाखांचा दंड केला आहे. आरबीआयच्या असेट क्लासिफेशन संदर्भातील सूचनांची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
सीएसबी बँक लिमिडेटला आरबीआयनं 63.60 लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या बिझनेस करस्पाँडन्टची कार्यमर्यादा आणि बँकेच्या ग्राहक सेवा यासंदर्भातील सूचनांचं पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. बचत खातेदारांना माहिती नसताना बँकेनं शुल्क आकारल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.
आरबीआयनं 11 फेब्रुवारीच्या आदेशानं इंडियन मर्चंटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड लखनौचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. यासंदर्भातील आदेश आरबीआयच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
