राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र वीज फिडरचे लोकार्पण; नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्याची दिलासा
नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व सभापती राहुल कूळमेथे यांच्या पाठपुराव्याला यश
एटापल्ली, दि. ७ (प्रतिनिधी) :
एटापल्ली शहरातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून उभारण्यात आलेल्या स्वतंत्र विद्युत फिडरचे लोकार्पण मंगळवारी उत्साहात पार पडले. या फिडरमुळे शहरातील नागरिकांना आता अधिक सक्षम, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर अल्पावधीतच काम पूर्ण करून ७ एप्रिल २०२६ रोजी नगराध्यक्षा रेखा मोहूर्ले व पाणीपुरवठा सभापती राहुल कूळमेथे यांच्या हस्ते या स्वतंत्र वीज फिडरचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी महावितरणचे कनिष्ठ अभियंता थेरे साहेब, लायनकर साहेब, भाजप शहराध्यक्ष राकेश तेलकुंटलवार, महेंद्र सुल्वावार, महावितरणचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एटापल्ली शहरासाठी स्वतंत्र वीज फिडर मंजूर व्हावा यासाठी नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार व पाणीपुरवठा सभापती राहुल कूळमेथे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतूनच या प्रकल्पासाठी निधी मंजूर होऊन काम पूर्णत्वास गेले.
नवीन फिडर सुरू झाल्यामुळे शहरात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच भविष्यातील वाढत्या वीज गरजांची पूर्तता करण्यासही या प्रकल्पामुळे मदत होणार असल्याने शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
