
जैरामपूर – मुधोली परिसरातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करा
कारवाईसाठी आष्टी पोलिस ठाण्यावर धडकले ग्रामपंचायत पदाधिकारी
आष्टी,
चामोर्शी : तालुक्यातील जैरामपूर – मुधोली परिसरात अवैधरीत्या देशी दारूची विक्री सुरू आहे. परिणामी, गावातील नवतरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भांडण व तंटे वाढत आहेत. याची दखल घेण्यासाठी गणपूर येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिनांक (४) शनिवारी आष्टी पोलिस ठाण्यावर धडकले. तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
आष्टी पोलिस स्टेशन हद्दीतील जैरामपूर – मुधोली परिसरात अवैध दारू विक्री, सुरू आहे. यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले आहे. मद्यपींकडून होणारी शिवीगाळ व भांडण-तंट्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिलांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.अवैध धंदे तत्काळ बंद करावे यासाठी गणपूर येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले असल्याने आष्टी पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.