“अवैध दारू तस्करीचे वाहन पकडताय… पण मूळ साखळीवर कारवाई कधी?” — अहेरीतील जनतेचा थेट सवाल
अहेरी (गडचिरोली), दि. १ एप्रिल २०२६ :
अहेरी पोलीसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल ७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असला, तरी या कारवाईनंतर एक महत्त्वाचा प्रश्न जनतेतून समोर येत आहे—“दारूची वाहने पकडताय, पण ती दारू नेमकी येते कुठून?”
दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी अहेरी पोलीसांचे पथक गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे इंदाराम जंगल परिसरात संशयित वाहनावर नजर ठेवण्यात आली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने जंगलाच्या दिशेने पळ काढला आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
यानंतर पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली असता, पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो (क्र. एमएच ४० सीए १७७२) मधून ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० मिली मापाच्या तब्बल ४३०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत सुमारे ३.४४ लाख रुपये असून वाहनासह एकूण मुद्देमाल ७.४४ लाख रुपये आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जनतेचा मुद्दा नेमका काय?
स्थानिक नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे—
वाहन पकडणे ही फक्त साखळीतील शेवटची कडी आहे
मुख्य पुरवठादार, साठवणूक केंद्र आणि मोठे रॅकेट अद्याप मोकाट आहेत
दारूचा उगम शोधल्याशिवाय अशा कारवाया तात्पुरत्या ठरतात
अनेकदा अशा कारवायांमध्ये वाहन चालक पसार होतो, पण मागील ‘मास्टरमाईंड’पर्यंत पोहोचण्यात यंत्रणा कमी पडते, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाकडून अपेक्षा काय?
दारू पुरवठ्याचे मूळ ठिकाण शोधणे, मोठ्या तस्करी साखळीचा भांडाफोड करणे,
सीमावर्ती भागातील तपास अधिक कडक करणे
स्थानिक स्तरावर माहिती देणाऱ्या जाळ्याला मजबूत करणे
अहेरी पोलीसांची कारवाई कौतुकास्पद असली तरी,
“मूळावर घाव बसला तरच अवैध दारूचा प्रश्न कायमचा सुटेल”
अशी ठाम भावना आता जनतेतून व्यक्त होत आहे.
त्यामुळे पुढील काळात पोलिसांनी केवळ वाहनांवर नाही, तर संपूर्ण तस्करी साखळीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
