नेलगुंडा येथे गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य मेळावा
गडचिरोली | दि. 9 जानेवारी 2025
गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत तसेच डॉ. शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन नेलगुंडा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य मेळावा सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 या वेळेत पार पडला.
हा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक, अहेरी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड यांनी केले. प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके साहेब, पोलीस उपनिरीक्षक विक्रम बुरंगे, पोलीस उपनिरीक्षक हिंगणे तसेच पोलीस स्टेशन नेलगुंडा येथील जिल्हा पोलीस अंमलदार, एसआरपीएफ व सीआरपीएफ स्टाफ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या आरोग्य मेळाव्यास पोस्टे हद्दीतील महाकापाडी, गोंगवाडा, भटपार, मोरमेठ्ठा, मर्दमलिंगा, नेलगुंडा आदी गावांतील सुमारे 280 ते 300 नागरिकांनी उपस्थिती लावली. उपस्थित नागरिकांना सीआरपीएफचे एसी कुंभार साहेब व प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके साहेब यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण तपासणी, हाडांचे विकार, डोकेदुखी, क्षयरोग तपासणी, हात-पाय दुखणे, डोळ्यांची तपासणी, बालरोग, रक्तदाब, सांधे व मनगट दुखणे, मधुमेह, छातीत दुखणे, खोकला आदी आजारांची तपासणी करण्यात आली. याचा लाभ एकूण 145 नागरिकांनी घेतला.
तसेच सीआरपीएफच्या वतीने सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम अंतर्गत नेलगुंडा, भटपार, गोंगवाडा, महाकापाडी, मर्दमलिंगा व मोरमेटा या गावांमध्ये प्रत्येकी 5 टेबलप्रमाणे एकूण 30 टेबल, 100 खुर्च्या व 75 ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
या वेळी प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधित कार्यालयांशी पाठपुरावा करून निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मेळाव्यास उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी अधिकारी अमोल सोळुंके साहेब यांनी उपस्थित नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
