गडचिरोलीत मोठी कारवाई : 44 माओवादी स्मारके एका दिवसात उध्वस्त
दि. 18 फेब्रुवारी 2026 | गडचिरोली
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक मानली जाणारी जिल्हाभरातील तब्बल 44 स्मारके आज संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आली. गडचिरोली जिल्हा पोलीस दल, सी-60 पथक आणि CRPF यांच्या सुमारे 800 जवानांनी 18 पथकांमधून व्यापक शोधमोहीम राबवत ही कारवाई पूर्ण केली.
या मोहिमेमुळे माओवाद्यांच्या उरलेल्या प्रतीकात्मक उपस्थितीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सुरक्षेचे वातावरण अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
दुर्गम भागात शोधमोहीम
गडचिरोली हा माओवादाच्या दृष्टीने संवेदनशील जिल्हा मानला जातो. दुर्गम जंगल परिसरात लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी माओवाद्यांनी विविध स्मारके उभारली होती. यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी 16 बीडीडीएस पथके, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांना सहभागी करून मोठी मोहीम उभी केली.
शोधदरम्यान 15 पोस्टे व उपपोस्टे हद्दीत एकूण 44 स्मारके आढळून आली. बीडीडीएस पथकाने तपासणी केल्यानंतर जवानांनी ही सर्व स्मारके सुरक्षितरीत्या पाडून टाकली.
उपविभागनिहाय कारवाई
एटापल्ली : 18
हेडरी : 17
भामरागड : 5
जिमलगट्टा : 2
धानोरा : 1
पेंढरी : 1
पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) या दुर्गम गावांमधील स्मारकांचा यामध्ये समावेश होता.
नागरिकांमध्ये विश्वास वाढला
ही स्मारके केवळ रचना नसून हिंसा आणि दहशतीचे प्रतीक होती. ती हटवल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस व प्रशासनावरील विश्वास वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस दल सतत कार्यरत असून नागरिकांनी माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.
