उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर उपोषण मागे
व्हाईस ऑफ मीडिया एटापल्ली च्या आंदोलनाला मोठा यश.
राकेश तेलकुंटलवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत संबंधित कामांना प्रशासकीय स्तरावर अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेली असून, सुरू असलेले साखळी उपोषण व आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.
एटापल्ली तालुक्यातील १) एटापल्ली–देवदा–गडचिरोली (राम-३५) २) एटापल्ली–जारावंडी रस्ता (राम-३६) तसेच ३) एटापल्ली–हेडरी–गट्टा रस्ता (राम-३५) या प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण व धोकादायक वळणे यामुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. अनेक अपघातांच्या घटना घडल्याने संतापाची लाट उसळली होती.
या पार्श्वभूमीवर Voice of Media शाखा एटापल्ली येथील स्थानिक पत्रकारांनी रवी रामगुंडेवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख सल्लागार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ०९ फेब्रुवारी २०२६ पासून साखळी उपोषण सुरू केले. १३ फेब्रुवारी २०२६ पासून आमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती. आंदोलनाला नागरिक, व्यापारी व विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला.
दरम्यान, मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली १५ जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली होती. तसेच १० फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत एटापल्ली–देवदा–गडचिरोली (राम-३५) व एटापल्ली–हेडरी–गट्टा (राम-३५) या रस्त्यांच्या कामांना जिल्हा खनिज निधी (DMF) योजनेतून मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
प्रशासकीय स्तरावर दोन्ही कामे ‘फायनलाइज’ करण्यात आली असून १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत (भाप्रसे) यांनी आंदोलनाची दखल घेत सकारात्मक पावले उचलल्याचे स्पष्ट केले. रस्त्यांच्या नूतनीकरणाबाबत शासन गंभीर असून लवकरच काम प्रत्यक्षात सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अखेर आंदोलनाला यश : सलग चार दिवस चाललेले साखळी उपोषण आणि त्यानंतर दोन दिवसांचे आमरण उपोषण अशा एकूण सहा दिवसांच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस लेखी आश्वासन मिळाल्याने आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण स्थळी समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे चित्र असून, आता प्रत्यक्ष कामास किती लवकर प्रारंभ होतो आणि दर्जेदार काम होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
