प्रतिनिधी: जनार्दन नल्लावार एटापल्ली
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे 23 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन; एटापल्ली तालुका शाखेचा इशारा
अधिकार्यांवरील गैरवर्तन व दबावाचा आरोप — जिल्ह्यात कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
एटापल्ली : पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत कार्यरत सहाय्यक गट विकास अधिकारी डी. बी. उराडे यांच्याकडून अधिकार नसताना ग्रामपंचायतींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप, दबाव व गैरवर्तन होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (DNE-136) तालुका शाखा एटापल्लीने 23 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत कार्यालयांना वारंवार भेटी देऊन खंडणीसारखी मागणी, तक्रारी नोंदविण्याची धमकी तसेच अधिकार्यांवर मानसिक दबाव टाकला जात असल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजावर परिणाम होत आहे.
या परिस्थितीमुळे जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
युनियनच्या तालुका शाखेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून संबंधित निवेदनाची प्रत प्रशासनाला देण्यात आली आहे.
