
एटापल्ली नगरपंचायतीतील प्रकार; साहित्य टाकले काढून, मुख्याधिकारी करतात ‘अप-डाऊन’
‘फायर बुलेट’चा अधिकाऱ्याकडून खासगी वापर?
बातमीदार: राकेश तेलकुंटलवार एटापल्ली
एटापल्ली : आग लागल्यानंतर तेथे अग्निशामक दलाचा बंब पोहोचू शकत नाही. अशावेळी जलदगतीने मदतकार्य करता यावे, यासाठी नगरपालिका व नगरपंचायतींना अग्निशमन (फायर) बुलेट उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, गडचिरोलीतील एटापल्ली नगरपंचायतीत ‘फायर’चे साहित्य काढून खुद्द मुख्याधिकारीच खासगी बुलेटप्रमाणे या वाहनाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करून जलदता आणणे, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तत्काळ पोहोचवण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, हा उद्देश समोर ठेवून ‘फायर बुलेट’ची रचना केली आहे. त्यावरून अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी प्रवास करू शकतात. दरम्यान, एटापल्ली नगरपंचायतीला चार महिन्यांपूर्वी एमएच ०२ जीजी ७६६९ क्रमांकाची ‘फायर बुलेट’ उपलब्ध झाली होती. मात्र, मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी बुलेटवरील अग्निशमनचे साहित्य काढून टाकले व तिचा साध्या बुलेटप्रमाणे वापर सुरू केल्याचे उजेडात आले आहे. तांबे हे अहेरी येथे वास्तव्यास आहेत. ते याच बुलेटने दररोजअहेरीवरुन एटापल्लीला ये-जा करीत आहेत. खुद्द मुख्याधिकारीच ‘फायर बुलेट’चा वापर स्वमालकीच्या बुलेटप्रमाणे करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘फायर बुलेट’चा मी स्वतःसाठी वापर करत नाही. ते वाहन नगरपंचायत आवारातच उभे आहे. तुम्ही कार्यालयात येऊनपाहू शकता.
प्रणय तांबे, मुख्याधिकारी एटापल्ली नगरपंचायत