गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
इराण–इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासन सतर्क; घरगुती एलपीजीचा तुटवडा नसल्याची ग्वाही
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) :
इराण–इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी राज्य शासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी संबंधित सर्व यंत्रणांना एलपीजी पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे आणि संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याची ग्वाही विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्यात मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरही गॅस पुरवठा अखंड राहील यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हास्तरावर विशेष समित्या
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. या समित्या गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे यासाठी जबाबदार असतील.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य
रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शाळा–महाविद्यालयांतील मेस, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अफवांवर कारवाई
गॅस पुरवठ्याबाबत समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या किंवा बनावट बातम्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही शासनाने केले आहे. तसेच रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे दररोज माहिती देण्यात येणार आहे.
राज्यात एलपीजीचा तुटवडा नाही
महाराष्ट्रात दररोज सुमारे ९,००० मेट्रिक टन एलपीजीची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी रिफायनरीमधील उत्पादन वाढविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत दैनिक उत्पादन ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आले असल्यामुळे राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, गॅस बुकिंग अॅप आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश तेल कंपन्यांना देण्यात आले असून तक्रार निवारणासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
