जुन्या वादातून चिमुकलीची हत्या केल्याची आरोपीची कबुली.
जया लाभसेटवार
उपसंपादिका यवतमाळ
दारव्हा(यवतमाळ):- जुन्या वादातून एका सात वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोथ गावात घडल्याचे उघडकीस आले. पोलीस तपासात घराशेजारीच राहणाऱ्या जाधव कुटुंबियातील सदस्यांनी तिचे अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच चिमुकलीच्या नाकातील सोन्याचा दागिना गहाळ झाल्याचे यावेळी दिसून आले. त्या दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली. तसेच या प्रकरणात असलेल्या चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत चिमुकली 20 मार्चपासून घरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दारव्हा पोलिसात दाखल केली होती. त्यावरून 21 मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक हे पथकासह बोथ गावात दाखल झाले आणि त्यांनी गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान यावेळी चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या कैलास जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यात घरामध्ये आढळून आला. त्यावेळी पोलिसांनी कैलास जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जुन्या वादातून हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी कैलास विलास जाधव, माला विलास जाधव, सोनी विलास जाधव, रंजना सोनू जाधव, यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
