पेरमिली तालुका निर्मिती करिता नागरिक आक्रमक; तहसीलदाराच्या मध्यस्थीने रास्ता रोको ला स्थगिती.
अहेरी(गडचिरोली):– मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पेरमिली तालुका निर्मितीसाठी पेरमिली परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदन, विनंती अर्ज, वेळप्रसंगी आंदोलन पुकारले. मात्र तालुका निर्मिती यादीतून पेरमिलीचे नाव वगळण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करीत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची प्रशासनाने दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामवासींची बैठक घेत सविस्तर चर्चा केली. यावेळी शासनाकडे पेरमिली तालुका निर्मितीसाठी प्रस्ताव सादर केला असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या सकारात्मक चर्चेअंती ग्रामवासींनी आंदोलन स्थगित केले. पेरमिली परिसरातील नागरिकांद्वारे मागील अनेक वर्षापासून या परिसरातील केंद्रस्थळ असलेल्या पेरमिलीला तालुक्याचा दर्जासाठी प्रशासन, शासन स्तरावर पाठपुरावा लावून धरला. त्यामुळे पेरमिली तालुका निर्माण कृती समितीच्या वतीने २३जानेवारीला जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करीत पेरमिलीला तालुक्याचा दर्जा न दिल्यास ५ फेब्रुवारीपासून पेरमिली मुख्य चौकात रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या चर्चेदरम्यान तहसीलदार प्रतीक आढाव, पेरमिली सरपंच किरण नैताम, माजी सरपंच प्रमोद आत्राम, पत्रकार आसिफ खान पठाण, प्रभारी पोलिस अधिकारी महाजन, माजी जि. प.सदस्य रामरेड्डी बंडमवार, बापू सडमेक, गणेश औतकर, विजय आत्राम, सपना बंडमवार, व्ही.सी कोंडागुरले, तुळशीराम चंदनखेडे, अमरनाथ गावडे, सुरज सेंगारपवार, कवीश्वर चंदनखेडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापारी संघटनेचा पाठिंबा.
पेरमिली तालुका निर्मिती करिता व्यापारी संघटने कडून गावातील सर्व दुकाने, हॉटेल तसेच संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.
तहसीलदाराने तात्काळ बोलावली विशेष बैठक.
तहसीलदार प्रतीक आढाव यांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या या आक्रमक धोरणामुळे पेरमिली गाठून परिसरातील नागरिकांची विशेष बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पेरमिली तालुका निर्माण संदर्भात चर्चा घडवून आणली. शासनाने जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती केली नसून अप्पर तालुका निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. पेरमिली परिसरातील नागरिकांची तालुका निर्मितीच्या रास्त मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामवासींना दिले. तहसीलदारांच्या लेखी हमीने अखेर ग्रामवासींनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.
