
बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर चकमक.
छत्तीसगढ:- बिजापूर-दंतेवाडा आणि कांकेर- नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत ३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. जवानांकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात अभियान राबविले होते. यात बिजापूर जिल्हा राखीव दलातील एक जवान शहीद झाला. तर दुसरी चकमक कांकेर-नारायणपूर (अबुझमाड) जिल्ह्याच्या सीमाभागात उडाली. यात ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. दोन्ही घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगड पोलिसांचे म्हणणे आहे.
सकाळपासून ऑपरेशन चालू.
छत्तीसगड सरकारच्या नक्षलवाद्यांबद्दलच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा एक भाग म्हणून एक संयुक्त पथक विजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात माओवादविरोधी कारवाईसाठी निघाले. सकाळी ७ वाजल्यापासून माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता. चकमकीच्या ठिकाणी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. पथकाकडून शोध सुरू होता.
महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटक.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला ९ फेब्रुवारीला बिजापूर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते. यावेळी दाेन जवान शहीद झाले होते. मागील आठवड्यात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात तब्बल १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. फेब्रुवारीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली हाेती.