
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात दिरंगी आणि फुलनार गावच्या जंगल परिसरात 11 फेब्रुवारी रोजी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद, तर एक पोलीस जवान जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी जवानावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षलवाद्यांची मोठी बैठक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे सी -60 पथक नक्षल अभियानावर होते. सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. दरम्यान दिवसभर ही चकमक चालली असून गडचिरोली पोलिसांनी नक्षल तळ उध्वस्त केला. मात्र एका जवानाच्या पोटाला गोळी लागल्याने ते शहीद झाले.तर दुसऱ्या जवानाच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी आहेत. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोली ला नेण्यात आले.