महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान
आष्टी, दि. 18 फेब्रुवारी 2026 — छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा. ज्योती बोभाटे या मुख्य वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर, स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या दूरदृष्टीवर तसेच त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी धोरणांवर सविस्तर प्रकाश टाकला. शिवाजी महाराजांचे आदर्श आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. कोरडे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी पिंकी आत्राम हिने केले, तर आभार प्रदर्शन कुमारी करीना पदा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव दृढ झाली असून शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
