अहेरी प्रकल्पातील लोहारा आश्रम शाळेतील बॅड टच प्रकरण; दोन शिक्षक निलंबित.
शिक्षकावर ॲट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल.
अहेरी(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा लोहारा (मुलचेरा) येथील विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर मूलचेरा पोलिसांनी ॲट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, अहेरी प्रकल्पातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा लोहारा येथील पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फड आणि माध्यमिक शिक्षक सुभाष खुशबराव लांडे यांच्याविरुद्ध येथिल 24 विद्यार्थिनींनी शाळेतील अधिक्षिकाकडे शनिवारी बॅड टच आणि मारहाण बाबत तक्रार दिली होती. संबंधित अधिक्षिकाने येथिल मुख्याध्यापक पुरी यांच्याकडे तक्रार देताच या गंभीर बाबीची दखल घेऊन येथील मुख्याध्यापकाने रविवारी सकाळीच अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना या घटनेची माहिती दिली. लगेच प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) सुहास वसावे आणि सहाय्यक प्रकल्प (शिक्षण) एस पी डोंगरे यांना रविवारी संबंधित शाळेत चौकशीसाठी पाठविले. चौकशीअंती गंभीर गुन्हा झाल्याचा निष्पन्न झाला.
त्यानंतर लोहारा शासकीय आश्रम शाळेतील तब्बल 24 विद्यार्थिनींना सोमवारी वैद्यकीय चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे पाठविण्यात आले. मात्र या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस तक्रार झाल्याशिवाय वैद्यकीय चाचणी होणार नसल्याने कळताच तात्काळ मुलचेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. मुलचेरा पोलीसांनी सदर विद्यार्थिनींची चौकशी करून फिर्यादीच्या सांगण्यावरून पदवीधर शिक्षक संदीप शिवाजी फळ यांच्यावर अट्रॉसिटी आणि मारहानीचा तर माध्यमिक शिक्षक सुभाष खुशबराव लांडे यांच्यावर अट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई मुलचेरा पोलीस करीत आहेत.
विशेष म्हणजे संदीप फड हे कन्या शाळा, सोडे आणि सुभाष लांडे हे इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथून याच शैक्षणिक क्षेत्रात लोहारा येथील शासकीय आश्रम शाळेत रुजू झाले होते.
काही दिवसापूर्वी भामरागड तालुक्यातील लाहेरी आश्रम शाळेत विषबाधा प्रकरणात येथील मुख्याध्यापक व अधीक्षक यांना निलंबित केले होते.
त्यानंतर आता अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा लोहारा च्या शिक्षकांवर येथील विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
