अनखोडा गावची पोलीस दलात ‘दमदार एंट्री’; आठ तरुण-तरुणींची निवड, गावात आनंदाचा जल्लोष
चामोर्शी : तालुक्यातील अनखोडा या छोट्याशा गावाने मोठी कामगिरी करत एकाचवेळी आठ तरुण-तरुणींची गडचिरोली जिल्हा पोलीस दलात निवड होण्याचा मान मिळवला आहे. या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून निवड झालेल्या युवक-युवतींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री, प्रतिकूल परिस्थिती आणि स्पर्धेची तीव्रता यांचा सामना करत या तरुण-तरुणींनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. लहानपणापासून पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पाहत त्यांनी सातत्याने मेहनत घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर त्यांच्या कष्टाला यश मिळत गडचिरोली जिल्हा पोलीस दलात अरविंद तिमाडे, संकेत कोहपरे, जॉकी निमसरकार, मेघा निमसरकार, श्रुती गुरुकर, साक्षी कोसरे, सानिका चहारे आणि डिंपल खरबनकर यांची निवड झाली आहे.
या यशामुळे अनखोडा गावाचे नाव जिल्हाभर उजळले असून परिसरातील इतर तरुणांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, मित्रमंडळी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी निवड झालेल्या सर्व युवक-युवतींचे अभिनंदन करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, कुटुंबीयांनीही आपल्या मुला-मुलींनी पोलीस दलात स्थान मिळविल्याचा अभिमान व्यक्त केला. समाजसेवा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धारही या तरुण-तरुणींनी व्यक्त केला आहे.
अनखोडा गावातील एकाचवेळी आठ युवक-युवतींची पोलीस दलात निवड झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
